भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये नोंदवलेल्या एकूण धावांपैकी एक-तृतियांश धावा मुंबई क्रिकेट विश्वातून पुढे आलेल्या फलंदाजांनी नोंदवल्या आहेत. चाळीस वेळा रणजी करंडकाचे विजेतेपद भूषवणार्या मुंबईने हाच रणजी करंडक चाळीस पैकी पंधरा वेळा सलग जिंकला आहे. या स्पर्धांमध्ये मुंबईच्या फलंदाजांनी 461 शतके आणि 58 अर्धशतके नोंदवली आहेत. क्रिकेट या खेळाचे एका अर्थाने भारतातील जन्मस्थान असणार्या मुंबईने, संपूर्ण देशाच्या असलेल्या आणि देशभरात खेळल्या जाणार्या या खेळावर सतंतच कसे अधिराज्य गाजवले आहे याचीच अ मिलियन ब्रोकन विंडोज ही चित्तवेधक कहाणी. रंजक किस्से आणि विश्लेषणाने परिपूर्ण अशा या पुस्तकात; विविध लीग, स्पर्धां, खेळाडू आणि चाहते यांच्याशी निगडीत चर्चेतून केवळ क्रिकेट या खेळाचेच नाही, तर खुद्द मुंबई शहराचे देखील शब्दचित्र उभे केले आहे. मकरंद वायंगणकर या पुस्तकातून आपल्या वाचकांची मैदानावरचे वातावरण आणि क्रिकेटची गोष्ट यांच्याशी ओळख करून देतात. एकमेवाद्वितीय असणार्या मुंबई आणि क्रिकेट यांच्या नात्याचे साक्षीदार असणारे हे पुस्तक या नात्यास मानाचा मुजरा आहे.